
बीड, 14 जानेवारी (हिं.स.)। किल्ले धारूर नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. या सभेत उपनगराध्यक्षपदी व स्वीकृत सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या. उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आलेल्या नगरसेविका सय्यद बानोबी शोकतअली यांची बिनविरोध निवड झाली. तर स्वीकृत सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीकडून डॉ. स्वरूपसिंह हजारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून डॉ. मयूर सावंत यांची निवड करण्यात आली. या निवडींची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केली.
तब्बल नऊ वर्षांनंतर धारूर नगरपरिषदेची निवडणूक पार पडली होती. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते व २१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नगराध्यक्षासह ११ नगरसेवक निवडून आले असून भाजपाचे ६ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ३ नगरसेवक निवडून आले होते. निवडणूक प्रक्रियेनंतर नियमाप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गट या तीनही पक्षांनी स्वतंत्र गट स्थापन करून गटनेत्यांची नियुक्ती केली होती. नियमानुसार राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपाला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य मिळणार असल्याने दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते.
यात भाजपाकडून डॉ. स्वरूपसिंह हजारी तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून डॉ. मयूर सावंत यांचे अर्ज सादर करण्यात आले होते. झालेल्या सर्वसाधारण सभेपूर्वी उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सव्यद बानोबी शोकतअली, भाजपाकडून रोहितसिंह हजारी तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अक्रम जरगर यांनी अर्ज दाखल केले होते.मात्र भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सय्यद बानोबी शोकतअली यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अजित ढेपे, नवनिर्वाचित नगरसेवक व विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis