
जळगाव, 14 जानेवारी (हिं.स.) महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, उद्यापासून निवडणूक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. गुरुवारी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्यासाठी देखील प्रशासनाकडून मतदान केंद्रावरील तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच मतदारांना चार उमेदवारांना मतदान करायचे असून त्यासाठी मतदारांना ३० सेंकदाचा अवधी मिळणार आहे. तसेच मतमोजणी ठिकाणी देखील तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण निकाल २ वाजेपर्यंत लागणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिका निवडणुकीच्या अंतिम तयारी बाबत माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड, पंकज गोसावी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना आयुक्त ढेरे म्हणाले, की बुधवारी सकाळी नऊ वाजेपासून मतदान यंत्रणा वाटप करण्याचे काम सुरू होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी ३०५५ अधिकारी व कर्मचारी अशी यंत्रणा राहणार आहे.
शहरात एकून मतदान केंद्रे ५१६ असणार आहे. यात विशेष मतदान केंद्रामध्ये २ (महिला विशेष), ६ (विशेष थिंम), ६ आदर्श मतदान केंद्रे असतील. तर मतदान केंद्रावर ३ हजार ५५ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असेल. यात मतदान अधिकारी क्रमांक १ ते ३ साठी प्रत्येकी ५७१, मतदान अधिकारी क्रंमांक ४ साठी २०० तर शिपाई ५७१ असतील. तसेच ५२ क्षेत्रीय अधिकारी व ७२ मास्टर ट्रेनर व बंदोबस्तसाठी ५१६ पोलीस कर्मचारी असतील. औद्योगीक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊन येथून सकाळी नऊ वाजता मतदान यंत्रणेचे वाटप सुरू होणार आहे. यासाठी मतदान यंत्रणा व कर्मचारी नेण्यासाठी एसटी बसेस ४१, मिनी बस १६, क्रुझर ५२, टेम्पो ट्रव्हलर २०, बोलेरो ६ अशा एकून १३५ वाहने वापरले जाणार आहे.
वखार महामंडळाच्या गोडाऊन क्रमांक १४ व १७ मध्ये मतमोजणी शुक्रवार (ता. १६) रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. सर्वात आधी टपाली मतपत्रिकांची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मोजणी सुरू होईल. सात ते आठ फेर्यांमधून दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. विजयी उमेदवारांना जागीच प्रमाणपत्र दिले जाईल. जे उमेदवार गैरहजर असतील, त्यांना महापालिकेतून प्रमाणपत्र घ्यावे लागेल.महानगरपालिका प्रशासनाने मतमोजणी सहा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या प्रभागानूसार होणार आहे. एकूण १४ टेबलवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या विभागात प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ ची मतमोजणी प्रत्येकी ६ फेऱ्यांमधून होईल. दुसऱ्या विभागात प्रभाग क्रमांक ४ साठी ६ फेऱ्या, तर प्रभाग ५ आणि ६ साठी ७ फेऱ्या होतील. तिसऱ्या विभागात प्रभाग ७ साठी ६ फेऱ्या, प्रभाग ११ आणि १२ साठी प्रत्येकी ७ फेऱ्या नियोजित आहेत. चौथ्या विभागाच्या नियोजनानुसार प्रभाग १३ साठी ७ फेऱ्या होईल. तर प्रभाग १४, १८ आणि १९ चे प्रत्येकी ५ फेऱ्या होईल. पाचव्या विभागात प्रभाग १५, १६ आणि १७ या तिन्ही प्रभागांचे प्रत्येकी ६ फेऱ्या होतील. तर सहाव्या विभागात प्रभाग ८ मध्ये ८ फेऱ्या, प्रभाग ९ मध्ये ९ फेऱ्या आणि प्रभाग १० चे एकूण ७ फेऱ्यांद्वारे मतदमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर