
नाशिक, 14 जानेवारी (हिं.स.)।
तीन आठवड्यांपासून सुरू असलेला नाशिक महापालिकेचा प्रचार मंगळवार, दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता थांबला. प्रचार संपताच शहरातील राजकीय पक्षांसह अपक्ष आणि उमेदवारांच्या प्रचार कार्यालय येथील फलक झाकण्यात आले. तसेच विविध प्रकारे वाहनांद्वारे सुरु प्रचार चालू होते ती वाहने देखील थांबली.
शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांनी तसेच विविध उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे बघायला मिळाले. आता गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात होणार असून ५.३० वाजता संपणार आहे. त्यासाठी विविध मतदान केंद्रांवर कंट्रोल युनिटस्, बॅलेट युनिटस् यांच्यासह निवडणूक कर्मचारी पोलीस बंदोबस्तात नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बसमधून मतदान केंद्रांकडे रवाना झाले.
इतके अधिकारी व कर्मचारी गुंतले निवडणूक कामाला शहरातील एकुण एक हजार ५६३ उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांपैकी २६६ मतदान केंद्रे संवेदनशील आणि अतिसंवेदनशील असून येथे विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय निवडणूक कामकाजासाठी ८ हजार ८०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
इतके जण करणार मतदान
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ४ हजार ८६० बॅलेट युनिटस् व १ हजार ८०० कंट्रोल युनिटस् (राखीव युनिटसह) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ३१ प्रभागांतून एकूण ७३५ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. त्यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे तर २०८ अपक्ष उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. त्याचप्रमाणे १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ६ लाख ५६ हजार ६७५ महिला आणि ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर तृतीयपंथी ७९ मतदार आहेत.
नियमभंग करणार्यांवर होणार कारवाई
शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवार, पक्ष किंवा कार्यकर्त्यांविरूद्ध लोकप्रतिनिधी कायदा व निवडणूक नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मतदान करुन लोकशाही बळकट करा
सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे. तसेच मतदारांनी निर्भयपणे, शांततेत आणि मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करावी.- मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका
चार मत देणे बंधनकारक
अ गट : पांढरा रंग, ब गट : फिका गुलाबी रंग, क गट : फिका पिवळा रंग तर ड गट : फिका निळा रंग असे चार गट ईव्हीएम यंत्रावर दिसतील. काही प्रभागांमध्ये तीन तर काही प्रभागांमध्ये चार यंत्र असतील. एका मतदाराला चार उमेदवारांना मतदान करावे लागेल. चार मते देणे बंधनकारक आहे. जर चारपैकी एखादे मत दिले नाही, तर मतदान अवैध म्हणजेच बाद ठरु शकते. मतदान केंद्रात मतदारांना मोबाईल नेण्यास मनाई आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV