खुणा लावलेली ऑलिव्ह रिडले कासवे गुहागर समुद्रकिनाऱ्यावर परत
रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : राज्याच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या सागरी कासव संवर्धन प्रयत्नांचे यश अधोरेखित करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घटनेत एक मादी ऑलिव्ह रिडले सागरी कासव (लेपिडोथेलिस ऑलिव्हेसिया) गुहागर समुद्रकिनाऱ्यावर येथे घरटे करण्यास
खुणा लावलेली ऑलिव्ह रिडले कासवे गुहागर समुद्रकिनाऱ्यावर परत


रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : राज्याच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या सागरी कासव संवर्धन प्रयत्नांचे यश अधोरेखित करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घटनेत एक मादी ऑलिव्ह रिडले सागरी कासव (लेपिडोथेलिस ऑलिव्हेसिया) गुहागर समुद्रकिनाऱ्यावर येथे घरटे करण्यासाठी परत आले.या कासवाच्या फ्लिपर्सना आयएनडी १११०९ आणि आयएनडी ११११० हे विशिष्ट ओळख क्रमांक असलेले धातूचे टॅग लावलेले दिसले, ज्यामुळे हे कासव पूर्वी नोंदणी केलेलेच आहे, हे स्पष्ट झाले.

कोकण किनारपट्टीवर भारतीय वन्यजीव संस्था (डब्लूआयआय) आणि कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त उपक्रमाचा भाग म्हणून २०२५ मध्ये ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या फ्लिपर्सना टॅग लावण्याची मोहीम राबवण्यात आली होती. जानेवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये एकूण ६२ मादी ऑलिव्ह रिडले कासवांना टॅग लावण्यात आले होते, त्यापैकी ५९ कासवांना केवळ गुहागर समुद्रकिनाऱ्यावरच टॅग लावण्यात आले होते. नोंदीनुसार याच कासवाला ३१ जानेवारी २०२५ रोजी त्याच घरटे करण्याच्या ठिकाणी टॅग लावण्यात आले होते, त्याच ठिकाणी घरटे करण्याच्या घटनेची नोंद शासनाच्या कांदळवन कक्षाद्वारे वन विभागाच्या राबवल्या जाणाऱ्या सागरी कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेले कासव मित्र शार्दूल तोडणकर व कांदळवन कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांनी केली.

विशेष म्हणजे टॅग लावलेली तीन मादी ऑलिव्ह रिडले कासवे त्याच प्रजनन हंगामात (२०२४-२५) पुन्हा गुहागर समुद्रकिनाऱ्यावर घरटे करण्यासाठी परत आली. अशा प्रकारे पुन्हा त्याच समुद्र किनाऱ्यावर घरटे करणे आणि पुन्हा सापडण्याच्या नोंदी वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. कारण त्या संशोधकांना लोकसंख्येचा आकार, स्थलांतराचे मध्यांतर, घरटे करण्याची वारंवारिता आणि अधिवासाविषयीची निष्ठा यांचा अंदाज लावण्यास मदत करतात. हे सर्व दीर्घकालीन संरक्षण व संवर्धन नियोजनासाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत.

अशा प्रकारे समुद्री कासव किंवा त्यांच्या खुणा आढळल्यास त्वरित कांदळवन विभागास कळविण्यात यावे, असे आवाहन कांदळवन विभागाच्या दक्षिण कोकण विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande