
पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)।
केंद्र शासनाच्या तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा 2019 आणि नियम 2020 अंतर्गत तृतीयपंथी समाजासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण, सशक्तीकरण आणि योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक – 14427 सुरू करण्यात आला आहे. या हेल्पलाइनवरून तृतीयपंथीयांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अडचणींचे निराकरण तसेच तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही हेल्पलाइन तृतीयपंथीयांना मार्गदर्शन, मदत व सल्ला देण्यासाठी उपयुक्त ठरणार असून त्यांच्या समस्या थेट संबंधित विभागांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणार आहे.
तृतीयपंथी समाजातील अधिकाधिक व्यक्तींनी या राष्ट्रीय हेल्पलाइन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु