
जिल्ह्यातून सव्वा लाख विद्यार्थी सहभागी होणार
छत्रपती संभाजीनगर, 14 जानेवारी (हिं.स.)।
राज्य गीत तसेच देशभक्तीपर गितांवर सामुहिक कवायत कार्यक्रम येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने दि.31 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा कार्यक्रम होणार असून या उपक्रमात जिल्ह्यातील5 वी ते8 वीचे 1लाख 25 हजार विद्यार्थी सहभागी होतील,असे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुर्वतयारी आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राज्यातील 1 लाख शाळांमध्ये 7 लाख शिक्षक व 2कोटी विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. संस्कार दशसुत्रीचे, रंग देशभक्तीचे असे या कार्यक्रमाचे नाव आहे.जिल्ह्यात 1 लाख 25 हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील, त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (मध्य.) आश्विनी लाठकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजन) अरुण शिंदे, मोटार वाहन निरीक्षक शशिकांत जोगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लढ्ढा, पोलीस उपनिरीक्षक गौतम पाताडे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती क्रांती धसवाडीकर, सचिन वाघ, हेमंत उशीट, चेतन कांबळे, मनोज चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती मेजर सैय्यदा फिरासात आदी उपस्थित होते.
श्रीमती लाठकर यांनी माहिती सादरीकरण केले. त्यांनी माहिती दिली की, यासंदर्भात शासनाने दि.4व दि.15डिसेंबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करुन निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी 30 हजार व तालुकास्तरावर प्रत्येकी 10 हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. दि.26रोजी सकाळी 8 ते 10 वा. दरम्यान हा कार्यक्रम होईल. प्रतिसाद पाहता एक लाख 25हजार विद्यार्थी सहभागी होतील,असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आलेले मैदान व्यवस्थापन, तांत्रिक व ध्वनी व्यवस्थापन, सुरक्षा व वाहतुक , विद्यार्थ्यांची नोंदणी, वेळेचे नियोजन व समन्वय, विद्यार्थ्यांची वाहतुक व्यवस्था, वैद्यकीय व आरोग्य सेवा व्यवस्थापन, स्वयंसेवक व्यवस्थापन व प्रशिक्षण अशा विविध मुद्यांवर सादरीकरण करुन माहिती देण्यात आली.या नियोजनासाठी विविध समित्यांचे गठन करुन व्यवस्थापन केले जाणार आहे.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची सुरक्षा, वाहतुक व अन्य व्यवस्थापन याबाबीवर विशेष लक्ष द्यावे. प्रत्येक कार्यक्रम स्थळी अग्निशमन व्यवस्था सज्ज ठेवावी. फिरत्या शौचालयांची व्यवस्था ठेवावी. विद्यार्थ्यांसाठी मेडिकल स्टॉल असावे. विद्यार्थ्यांना पुरेसा आहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थी एकाच वेळी एकाच सुरात राज्यगीत व देशभक्तीपर गितांच्या तालावर कवायत करतील, या उपक्रमासाठी जिल्हा ते तालुका पातळीवर मैदाने नक्की करणे, विद्यार्थ्यांची वाहतुक शक्यतो करावी लागणार नाही किंवा कमितकमी करावी लागावी यादृष्टीने नियोजन करावे,असे निर्देशही त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis