
पुणे, 14 जानेवारी (हिं.स.)। पुणे शहर व प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात येत्या १९ जानेवारी पासून आयोजित करण्यात येत असलेल्या बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेले उच्च दर्जाचे रस्ते जिल्ह्यातील शेती, लघुउद्योग व पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील असा विश्वास पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज व्यक्त केला. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये डुडी यांनी सायकल शर्यत जाणार असलेल्या विविध गावांमधील स्थानिकांशी थेट संपर्क करून स्पर्धेमुळे झालेल्या पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे विविध क्षेत्रात होऊ शकणाऱ्या प्रगतीविषयीच्या भावना पत्रकारांसमोर मांडल्या.“ज्या व्यक्त्तींशी थेट संपर्क साधून आम्ही त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्या व्यक्तींना वेळेच्या कमतरतेमुळे आज आपल्यापुढे आणता आले नाही. परंतु, रस्ते विकासामुळे बदलेल्या परिस्थितीविषयी त्यांच्या भावना त्यांच्याच शब्दात या प्रेस रिलीजच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहोत”, असे डुडी यांनी आवर्जून नमूद केले.सायकल शर्यतीमुळे ग्रामीण भागात बळकट झालेले रस्त्याचे जाळे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असून शेतात पिकवलेला माल अवघ्या काही तासांत शहरात पाठवणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे, त्यामुळे सायकल शर्यतीचा उपक्रम शेती विकासाला बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना शेतकरी वर्गाने व्यक्त केली असल्याचे डुडी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु