
रायगड, 14 जानेवारी (हिं.स.)। सह्याद्री ट्रेकर्स श्रीवर्धन रायगड या समूहाने रायगड–पन्हाळा, पावनखिंड ते विशाळगड अशी तब्बल ६२ कि.मी. अंतराची ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम दिनांक ८ ते १० जानेवारीदरम्यान यशस्वीरीत्या पूर्ण केली. तीन दिवस चाललेल्या या आव्हानात्मक मोहिमेत सह्याद्रीच्या दुर्गम डोंगरदऱ्या, घनदाट जंगल, कडेकपारी व ऐतिहासिक पायवाटांवरून दिवस-रात्र चालत सदस्यांनी आपली क्षमता सिद्ध केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने पावन झालेल्या मार्गावरून पदभ्रमंती करताना इतिहासाचा साक्षात्कार व्हावा, त्या घटनांचा अर्थ समजावा आणि वारसा जपण्याची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने ही मोहीम आखण्यात आली होती. पावनखिंडसारख्या रणभूमीचा अनुभव घेताना अनेक नैसर्गिक व शारीरिक अडथळ्यांचा सामना करावा लागला; मात्र जिद्द, शिस्त आणि संघभावनेच्या बळावर सर्व अडथळे पार करण्यात आले.
या यशस्वी मोहिमेसाठी नगराध्यक्ष मा. श्री. अतुलभाई चौगुले, उपनगराध्यक्ष मा. श्री. अनंत दादा गुरव, मा. श्री. शिवराजभाई चाफेकर, मा. श्री. प्रसाद दादा भुवड, मा. श्री. सुनील वाणी व मा. श्री. काशीनाथ दादा गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सह्याद्री ट्रेकर्स श्रीवर्धन रायगड या समूहाकडून यापूर्वीही दुर्गसंवर्धन, स्वच्छता मोहिमा व ऐतिहासिक जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. या पदभ्रमंती मोहिमेमुळे तरुणांमध्ये इतिहासप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि दुर्गरक्षणाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके