
जळगाव , 14 जानेवारी (हिं.स.) कोविड काळात बंद झालेली भुसावळ-मुंबई पॅसेंजर सेवा अद्याप सुरु झाली नाहीय. यामुळे जळगावकरांना नाशिक, कल्याण, ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाण्यासाठी सोयीची ठरणारी ही पॅसेंजर पुन्हा सुरु करण्याची यावी, अशी मागणी पाचोऱ्याच्या कृती समितीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भुसावळहून मुंबईकडे दररोज अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असल्या, तरी त्या प्रामुख्याने मोठ्या स्थानकांवर थांबतात. त्यातही या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या आधीच प्रवाशांनी खच्चून भरलेल्या असतात. परिणामी, जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना त्यामध्ये बसण्यास जागा मिळत नाही. अनेकदा तासनतास उभ्याने प्रवास करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेता भुसावळ–मुंबई पॅसेंजर गाडी तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून जोर धरत आहे. सध्या भुसावळ–इगतपुरी आणि भुसावळ–देवळाली या दोन मेमू गाड्या सोडल्या, तर भुसावळ ते मुंबई दरम्यानच्या लहान स्थानकांवर प्रवाशांना चढ-उतारासाठी कोणतीही गाडी उपलब्ध नाही. यामुळे भुसावळ–मुंबई पॅसेंजर गाडी तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून जोर धरत आहे. पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरू झाल्यास लहान स्थानकांवरील प्रवाशांना दिलासा मिळेल. त्यांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर