
सोलापूर, 14 जानेवारी (हिं.स.)सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६८ गट व ११ पंचायत समित्यांचे १३६ गण आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील उमेदवारासाठी एका उमेदवारास दोन मते द्यावी लागणार आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे गट व गणाअंतर्गत २४ लाख ५९ हजार २२७ मतदार आहेत.सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी असलेल्या एकूण मतदारांमध्ये ३८ हजार ९०९ मतदार दुबार आहेत. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगाने दुबार मतदारांपर्यंत जाऊन त्यांच्याकडून हमीपत्र घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु, सर्व दुबार मतदारांपर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोचू शकली नाही. अनेक मतदारांची नावे नगरपालिका, महापालिका व जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आहेत.नगरपालिका व महापालिकांसाठी मतदान करुन काहीजण आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी देखील मतदान करतील, अशी स्थिती आहे. आता महापालिकेसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तत्पूर्वी, दुबार मतदार नेमके कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान करणार हे हमीपत्र घेणे शक्य नाही. कारण, गुरुवारी महापालिकेसाठी मतदान झाल्यावर जिल्हा परिषदेचीच निवडणूक बाकी असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड