
छत्रपती संभाजीनगर, 14 जानेवारी (हिं.स.)।महागामी संगीत अकादमीच्या वतीने १६ ते १९ जानेवारी या कालावधीत 'शारंगदेव महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. महागामी गुरुकूलच्या रंगमंचावर दररोज सायंकाळी साडेसहा वाजता संगीत, नृत्य सादरीकरण होईल. यंदा महोत्सवात अवधूत गांधी, अश्विनी भिडे, शशधर आचार्य, नर्तकी नटराज आदी मान्यवर कलाकार सहभागी झाले आहेत, अशी माहिती 'महागामी गुरुकूल'च्या संचालिका पार्वती दत्ता यांनी दिली.
महागामी रिसर्च फाउंडेशन आणि एमजीएम विद्यापीठ यांच्या वतीने १८ वा शारंगदेव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शारंगदेव प्रसंग, शारंगदेव समारोह आणि शारंगदेव स्पंदन या तीन सत्रात चार दिवस कार्यक्रम होणार आहेत.
शारंगदेव समारोहात १६ जानेवारी रोजी सायंकाळी अवधूत गांधी यांचे वारकरी परंपरेतील संगीत, पार्वती दत्ता आणि शिष्यांचे ओडिसी नृत्य सादर होईल. १७ जानेवारीला विदुषी अश्विनी भिडे यांचे ख्याल गायन, पद्मश्री नर्तकी नटराज यांचे भरतनाट्यम आणि १८ जानेवारीला गुरु शशधर आचार्य आणि सहकाऱ्यांचे 'छाऊ नृत्य' सादर होणार आहे. पार्वती दत्ता आणि शिष्यांच्या धृपदांगी कथकने महोत्सवाची सांगता होईल.
'शारंगदेव प्रसंग' उपक्रमात दररोज सकाळी १० वाजता कला क्षेत्रातील विविध विषयांवर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. नाट्यशास्त्रातील गती प्रचार (डॉ. जयश्री राजगोपालन), परंपरेपासून डिजिटलपर्यंत गुरुंचा वारसा हस्तांतरीत करणे (गुरु शॅरन), वारकरी परंपरा संगीत (अवधूत गांधी), संगीत परंपरा आणि सर्जनशीलता (पद्मश्री अश्विनी भिडे), भरतनाट्यमचे पारंपरिक रत्न (डॉ. नर्तकी नटराज), वक्ष, पार्श्व विन्यास (पार्वती दत्ता) आणि छाऊ परंपरा (शशधर आचार्य) या विषयांवर चर्चासत्र होणार आहे. या उपक्रमात पाश्चात्य ग्रंथांमधील भारतीय नृत्याचा इतिहास डोनोव्हान रोबर्ट (दक्षिण आफ्रिका), नृत्य हालचाल आणि स्नायू-सांगाड्याच्या दुखापती - डॉ. क्लेअर हिलर (सिडनी), पश्चिमेकडील देशांमध्ये भारतीय नृत्ये शिकणे आणि प्रसार करणे -सोनिया गाल्वाओ (ब्राझिल) यांचाही सहभाग आहे. यानिमित्त रागमाला चित्रकलेवरील प्रदर्शन चार दिवस भरविण्यात येणार आहे.
दरम्यान, कला संशोधकांचे ५० शोधनिबंध महोत्सवात सादर केले जाणार आहेत. देश-विदेशातील मान्यवरांचा सहभाग राहणार आहे. रसिकांनी महोत्सवाला उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis