
अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणूक तसेच मतमोजणीच्या काळात मतदान केंद्रावर कर्मचारी, अधिकारी किंवा मतदारांची प्रकृती अचानक बिघडल्यास तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. विशेषतः वयोवृद्ध, आजारी नागरिक, गरोदर महिला व दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदान व मतमोजणीदरम्यान रक्तदाब वाढणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे अशा तक्रारी उद्भवू शकतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार पेटी तसेच आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध राहणार आहे. मतमोजणी केंद्रावरही वैद्यकीय पथके कार्यरत ठेवण्यात येणार असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक व वाहनचालक अशा कर्मचाऱ्यांची निवडणूक काळात विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक महत्त्वाच्या मतदान केंद्रावर डॉक्टर, नर्स व आरोग्य सेवकांचा समावेश असलेले वैद्यकीय पथक तैनात राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व सुरक्षित पार पडावी यासाठी आरोग्य विभाग व निवडणूक प्रशासनामध्ये समन्वय ठेवण्यात आला आहे. मतदान किंवा मतमोजणीदरम्यान एखादा मतदार किंवा कर्मचारी बेशुद्ध पडल्यास तातडीने प्रथमोपचार दिले जातील. गरज भासल्यास रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर बीपी मशीन, साखर तपासणी साहित्य, आवश्यक औषधे व प्राथमिक उपचार साहित्य उपलब्ध असेल. शहरातील विविध मतदान केंद्रे तसेच मतमोजणी केंद्रांवर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सेवा दिली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी