
लातूर, 15 जानेवारी (हिं.स.)।लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आला आहे. मतमोजणीपूर्वीच ४१ उमेदवारांच्या पात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे.
माजी नगरसेवक प्रकाश पाठक यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की, ज्यांनी मागील कार्यकाळात भ्रष्टाचार केला आहे, त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात यावे. निवडणूक आयोगाने यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांना दिले होते.प्रकाश पाठक यांनी असा आरोप केला आहे की, आयुक्तांनी यावर योग्य कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता हा निकाल थांबवण्यासाठी किंवा संबंधित उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यासाठी ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या यादीमध्ये प्रभाग १ ते १८ मधील अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे:
विक्रांत गोजमगुंडे (प्रभाग ५)
सचिन मस्के (प्रभाग ७)
प्रविणकुमार अंबुलगेकर (प्रभाग ११)
अँड. दिपक मठपती (प्रभाग १५)
अजय कोकाटे, गिरीश पाटील (प्रभाग १६) ...आणि इतर अनेक दिग्गज!
दुसरीकडे, महापालिका आयुक्त मानसी मीना यांनी स्पष्ट केले आहे की, प्रकाश पाठक यांची याचिका यापूर्वीच (२९ डिसेंबर रोजी) निकाली काढण्यात आली असून त्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. आता लातूरकरांचे लक्ष याकडे लागले आहे की, हे ४१ उमेदवार निवडून आले तरी खुर्चीवर बसणार की अपात्र ठरणार?
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis