
अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.) : अमरावती महानगरपालिका निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक १७ मधील गडगडेश्वर शारदा विद्यालय येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने मोठा गोंधळ उडाला.
ईव्हीएम मशीन बंद पडल्यावर तात्काळ मशीन बदलण्यात न आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने केला. यामुळे उमेदवाराने मतदान केंद्रात प्रवेश करून आक्रमक पवित्रा घेतला. या घटनेमुळे मतदान प्रक्रियेत खंड पडला असून मतदारांचा वेळ वाया जात असल्याचेही त्यांनी सांगितले.घटनेनंतर मतदान केंद्रात जोरदार वादावादी झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून उमेदवारासह उपस्थित सर्वांना मतदान केंद्राबाहेर काढले.या प्रकारामुळे काही काळ मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. निवडणूक प्रशासनाने पुढील प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी