
छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)। 'विद्यार्थ्यांनी नेतृत्वकरण्याची सवय ठेवावी. एअर फोर्स आणि आर्मी नेव्ही क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. तुमचे वय हे स्वप्न बदलण्याचे वय आहे, त्यासाठी झपाटून वेडे झाले पाहिजे. मी काही तरी करू शकते, हा आत्मविश्वास असावा. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःलाच धडपड करावी लागते,' असे प्रतिपादन निवृत्त वायुसेना अधिकारी स्क्वॉड्रन लिडर प्रियंका ओसवाल यांनी केले. कन्नड येथील येथील सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळसाहेब पवार फाउंडेशन यांच्या वतीने कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात तीन दिवसांच्या व्याख्यानमालेस सुरुवात झाली. वायुसेनेतील सेवानिवृत्त अधिकारी प्रियांका ओसवाल यांनीसंरक्षण क्षेत्रातील संधी या विषयावर संवाद साधला. त्यांची मुलाखत नवीन काळे यांनी घेतली.
'मुलींना एअर्स फोर्समध्ये मोठी संधी आहे. त्यासाठी भाषेचे बंधन नाही. माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर अशक्य काहीच नाही,' असे ही त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमास छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योगपती मानसिंह पवार, सचिव चंद्रकांत देशमुख, प्राचार्य डॉ. विजय भोसले, प्रा. डॉ. राहुल क्षिरसागर, वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार, डॉ. रुपेश मोरे, प्रा. संतोष देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी तर आभार प्रा. संतोष मतसागर यांनी मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis