
छत्रपती संभाजीनगर, 15 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यासंदर्भात जिल्ह्यात राबवावयाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तातडीने आढावा घेतला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, डॉ. सुचेता शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्रथ.) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकाई (माध्य.) आश्विनी लाठकर, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी विद्याधर शेळके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी निवडणूक यंत्रणा, मनुष्यबळ उपलब्धता, मतदान यंत्रे उपलब्धता, जिल्हा पातळीवर स्थापित करावयाचे कक्ष, तालुका पातळीवर स्थापित करावयाचे कक्ष, प्रतिबंधात्मक कारवाई, कायदा सुव्यवस्था इ. बाबत आढावा घेतला.
असा आहे निवडणूक कार्यक्रमः-
या निवडणुकीची सूचना 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल.
नामनिर्देशन पत्र दाखल करणे- शुक्रवार दि.१६ ते मंगळवार दि.२१ जानेवारी २०२६.
नामनिर्देशन पत्र छाननी- बुधवार दि.२२ जानेवारी २०२६ (सकाळी ११ वा. पासून) त्यानंतर लगेचच वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.
उमेदवारी माघारी- दि.२३, दि.२४ जानेवारी व दि.२७ जानेवारी २०२६ सकाळी ११ ते दुपारी ३ वा. पर्यंत.
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसुद्धी- मंगळवार दि.२७जानेवारी दुपारी साडेतीन वा. नंतर
मतदान- गुरुवार दि.५ फेब्रुवारी २०२६ सकाळी साडेसात ते सायं. साडेपाच वा. पर्यंत.
मतमोजणी-शनिवार दि.७ फेब्रुवारी सकाळी १० वा. पासून.
संबंधित क्षेत्रात आचारसंहिता
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. संबंधित क्षेत्रात ही आचारसंहिता लागू झाली असली तरी अन्य ठिकाणीदेखील संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही; परंतु नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल.
दोन मते देणे अपेक्षित
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. त्यामुळे एका मतदाराने दोन मते देणे अपेक्षित असते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis