
अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.) : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान सुरू असतानाच अमरावतीच्या काही मतदान केंद्रांवर गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रे उलट्या क्रमाने ठेवण्यात आली आहेत, ज्यामुळे मतदारांना गैरसोय होत आहे.
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले, निवडणूक आयोगाने जाणूनबुजून मतदान यंत्रे उलट्या क्रमाने ठेवली आहेत. सामान्यपणे अ, ब, क, ड या क्रमाने ठेवली जाणारी यंत्रे ड, क, ब, अ अशा उलट्या क्रमाने लावण्यात आली आहेत. यावर कुणीही उत्तरदायित्व स्वीकारण्यास तयार नाही. ही लोकशाहीची हत्या आहे.अडसूळ म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांपासून निवडणूक आयोगाचे अधिकारीही अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. आपण हिंदुस्थानात राहतो. वाचायला डावीकडून उजवीकडे सुरुवात करतो. खऱ्या अर्थाने मतदान यंत्रे अशा पद्धतीने लावली पाहिजेत. विरोधकांना पराजय दिसत असल्यामुळे ही कारस्थान रचली गेली आहे, असे ते म्हणाले.अमरावतीत सुमारे ४० टक्के मतदान केंद्रांवर यंत्रे उलट्या क्रमाने लावण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आणि मतदारांना अत्यंत सावध राहून मतदान करण्याचे आवाहन केले.--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी