
श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान मंदिर गाभारा बांधकाम करण्यात येणार
बीड, 15 जानेवारी (हिं.स.)। नाथ संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड मंदिराच्या गाभाऱ्याचे दगडी बांधकाम सुरू आहे. या कामासाठी सावरगाव ग्रामस्थांनी ३ कोटी रुपयांची देणगी देण्याचा संकल्प केला आहे. पहिल्याच बैठकीत ६५ लाख रुपये जमा झाले
श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचे विश्वस्त आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत सावरगाव येथे विकास आढावा बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाला. याबाबत माहिती विश्वस्त साहेबराव म्हस्के यांनी दिली. बैठकीस विश्वस्त समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, उपाध्यक्ष बाबासाहेब महादेव म्हस्के, रमेश ताठे पाटील, नवनाथ म्हस्के, सरपंच
अर्जुन म्हस्के उपस्थित होते. मंदिराचा गाभारा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सीमेवरील दर्जेदार दगडातून तयार होतो आहे. या कामासाठी ७३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार झाले आहे. पुढील तीन वर्षांत हा खर्च १०० कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो. गाभाऱ्याचा आकार १०० बाय १५० फूट असून उंची १०९ फूट आहे. संपूर्ण बांधकाम दगड़ी पद्धतीने होणार आहे. काम पूर्ण होण्यासाठी तीन वर्ष लागणार आहेत. सावरगाव ग्रामस्थांनी ३ कोटी रुपये देण्याचा संकल्प केला आहे. एका मजुरीवर गुजराण करणाऱ्या भाविकाने १ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. आमदार सुरेश धस यांनी स्वतःच्या वतीने ५२ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. त्यांच्या जामगाव येथील ग्रामस्थांकडूनही निधी जमा केला जाणार आहे. या बैठकीत वृद्धेश्वर तेधानोरा रस्त्याची पाहणी झाली. सावरगाव चौकात १०० बाय १०० फूट सर्कल तयार होणार आहे. यामुळे गावाचा कायापालट होणार आहे. श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाकडे जाणारे तीन रस्ते विकसित होणार आहेत. एक गवळी वाडा मार्गे वृद्धेश्वरकडे, दुसरा शेंडगेवाडी मार्गे माणिक दौडेकडे, तिसरा मच्छिंद्रनाथ गड ते श्रीक्षेत्र कानिफनाथ मंदिर मढीकडे जाणारा.या सर्व रस्त्यांची रुंदी वाढवली जाणार आहे. सावरगाव चौक ते मंदिरापर्यंत पथदिवे बसवले जाणार आहेत. त्यामुळे रात्रंदिवस वाहतुकीस सुविधा मिळणार आहे. मंदिराचा गाभारा आणि इतर विकासकामे शेकडो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देतील. भाविकांनी या कामासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन साहेबराव म्हस्के यांनी केले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis