अमरावती - आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची विविध मतदान केंद्रांना भेट
अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.) अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळपासून शहरातील सर्व प्रभागांमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावून उत्स्फ
महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची विविध मतदान केंद्रांना भेट  अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती


अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.) अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळपासून शहरातील सर्व प्रभागांमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावून उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावण्यास प्रारंभ केला असून संपूर्ण शहरात निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात एकूण ८०५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था, तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत व वेळेत पार पडावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रशिक्षित निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, अमरावती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी आज सकाळी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदान यंत्रांची स्थिती, मतदारांसाठी करण्यात आलेली व्यवस्था तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांचे कामकाज यांचा सविस्तर आढावा घेतला. मतदान प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पडावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत, सुरक्षित व नियोजित वेळेत पार पडावी, यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन, निवडणूक यंत्रणा, पोलीस प्रशासन तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी समन्वयाने कार्यरत आहेत. नागरिकांनी निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande