
पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला. मात्र सकाळच्या सुरुवातीच्या टप्प्यात नेहरूनगर, चिंचवडगाव येथील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याचे प्रकार घडले. त्यामुळे मतदान प्रक्रियेला तात्पुरता विलंब झाला. निवडणूक प्रशासनाने तातडीने पर्यायी मशिन उपलब्ध करून देत मतदान सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या. दरम्यान, मतदान केंद्रांमध्ये मोबाईल फोन नेण्यास घातलेल्या बंदीमुळे काही ठिकाणी वादाचे प्रसंगही पाहायला मिळाले. मतदानासाठी आलेल्या मतदारांनी मोबाईल नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत निवडणूक कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदान केंद्राच्या आत मोबाईल नेण्यास मनाई असल्याचे स्पष्ट करत कर्मचाऱ्यांनी नियमांची अंमलबजावणी केली. काही ठिकाणी यामुळे तणाव निर्माण झाला असला तरी पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. प्रशासनाकडून सर्व केंद्रांवर परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून मतदारांनी शांततेत व निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु