
बीड, 15 जानेवारी (हिं.स.)।
अंबाजोगाई शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या मात्र मागील चार महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना नूतन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकीनंतर पदभार स्वीकारताना दिलेले आश्वासन पूर्ण करत मुंदडा यांनी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापैकी एका महिन्याचा पगार त्यांच्या खात्यात जमा केला आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेकडो कामगारांना दिलासा मिळाला असून, शहरात नगराध्यक्षांच्या या संवेदनशील निर्णयाचे स्वागत होत आहे.
नगर परिषदेच्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. सणासुदीच्या काळात हक्काचे पैसे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता होती. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी पदभार स्वीकारताच या प्रश्नाला प्राधान्य दिले. त्यांनी प्रशासनाला थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे कडक निर्देश दिले होते. या मोहिमेला यश आले असून, जमा झालेल्या निधीचा पहिला विनियोग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा झाली आहे.
नगर परिषदेची आर्थिक स्थिती सध्या नाजूक असली तरी, मार्च अखेरपर्यंत संपूर्ण आर्थिक घडी पुन्हा बसवण्याचा निर्धार मुंदडा यांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात जशी कर वसुली होईल, त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचे उर्वरित थकीत वेतनही प्राधान्याने दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. केवळ स्वच्छता कर्मचारीच नव्हे, तर थकीत वीज बिले आणि इतर प्रलंबित देयके मार्गी लावण्यासाठी प्रशासन नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे. शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि कष्टकरी कर्मचाऱ्यांचे हक्क वेळेवर मिळण्यासाठी शहरातील नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता व पाणी कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहनही नगराध्यक्षांनी यावेळी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis