रायगडात हजारो महिलांच्या उपस्थितीत ‘सौभाग्याचं लेणं’ कार्यक्रम साजरा
रायगड, 15 जानेवारी (हिं.स.)। महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या झेप फाउंडेशनच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून ‘सौभाग्याचं लेणं’ अर्थात हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. चित्रा आस्वाद पाटील यांच्या नेतृत्व
हजारो महिलांच्या उपस्थितीत ‘सौभाग्याचं लेणं’ कार्यक्रम साजरा


रायगड, 15 जानेवारी (हिं.स.)।

महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या झेप फाउंडेशनच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून ‘सौभाग्याचं लेणं’ अर्थात हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. चित्रा आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली २००९ पासून अखंडपणे सुरू असलेला हा उपक्रम मकर संक्रांतीच्या दिवशी नवेनगर फाटा, बांधण (कुईस रोड) येथे दिमाखात संपन्न झाला.

या कार्यक्रमास खारेपाठ विभागातील हजारो महिलांनी उपस्थित राहून हळदी-कुंकूचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी मीनाक्षीताईंच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल आठवणींना उजाळा दिला. झेप फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सौ. चित्रा आस्वाद पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधताना भावनिक शब्दांत सांगितले की, “मीनाक्षीताई आपल्या सोबत असताना या उपक्रमाला जसा भरभरून प्रतिसाद मिळत होता, तसाच प्रेमाचा ओघ आजही कायम आहे.

आज प्रत्यक्ष आपल्यात नसल्या तरीही मोठ्या संख्येने भगिनी उपस्थित राहिल्या, हे पाहून मन भरून आले.” हा कार्यक्रम केवळ एक आयोजन नसून महिलांच्या एकतेचा, संस्कृतीचा आणि सन्मानाचा उत्सव असल्याचे त्यांनी नमूद केले. पारंपरिक हळदी-कुंकूच्या निमित्ताने महिलांना एकत्र आणून सांस्कृतिक परंपरा जपणे व सामाजिक बंध अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, नीलिमा पाटील, शर्मिला पाटील, मंजुषा कुद्रीमोती आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी झेप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande