
रत्नागिरी, 15 जानेवारी, (हिं. स.) : ग्रंथाली प्रतिभांगण, जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय विज्ञानधारा एकांकिका स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (पाटपन्हाळे, ता. गुहागर) विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला.
ही स्पर्धा चिपळूणच्या ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाली. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने, चिपळूण पंचायत समितीचे श्री. शिगवण, श्री. देसाई, रत्नागिरी विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदेश कदम, कार्यवाह सुभाष सोकासने, श्री. बनगर, शिवाजी पाटील, चिपळूण तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष शैलेश सुर्वे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाने कचरा व कचरा स्रोत या विषयावरील नाट्यातून विज्ञानाकडे ही एकांकिका सादर करून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळविला. विद्यालयातर्फे शमिका सुमंत भिडे, नेहा संदीप निवाते, ओजस्वी सुधीर वासनिक, कस्तुरी समीर वझे, सावनी विक्रांत दीक्षित, शार्दूल भूषण ओक, मिहीर समीर पुरोहित या विद्यार्थ्यांनी एकांकिकेत सहभाग नोंदवून सादरीकरण करून सुयश पटकावले.
स्पर्धेतील यशामुळे विज्ञान भवन मुंबई येथे विज्ञान एकांकिका स्पर्धेत एकांकिका सादरीकरणाची संधी पाटपन्हाळे विद्यालयाला लाभणार आहे. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक के. डी. शिवणकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. वाय. भिडे तसेच शशिकांत महाजन आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी