
छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)।तिफणचा लोकमानसात ब्रह्मा, विष्णू, महेश असा संदर्भ आहे. एक फण दाण्याचा, दुसरा घामाचा आणि तिसरा पोटाचा असून जगाच्या पाठीवर एकमेव ब्रह्मचैतन्य समजलेला पहिला व्यावसायिक म्हणजे शेतकरी होय. तिफण कविता महोत्सव हा खऱ्या अर्थाने शेतीमातीचा सन्मान आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शेतकरी कवी नारायण सुमंत यांनी केले.
कन्नड येथे भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषद, तिफण आणि सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने आठवा राज्यस्तरीय तिफण कविता महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी, गीतकार नारायण सुमंत, कवी राजेंद्र दिघे, प्राचार्य डॉ. विजय भोसले, अॅड. कृष्णा जाधव, डॉ. अंबादास सगट, प्रा. रंगनाथ लहाने, सुनील डोके, प्राचार्य राहुल क्षीरसागर, दिलीप सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 'आजचे कवी प्रसिद्धीसाठी घाई करतात. कविता हा गंभीर प्रकार आहे. या वातावरणात आशयगर्भ व दर्जेदार लेखन दुर्लक्षित रहाते. कवितेत रसात्मकता महत्त्वाची असते. मुक्तछंदालाही एक लय असते. सामाजिक आशयसुद्धा दमदारपणे मांडता येऊ शकतो. त्यासाठी अभ्यास कमी पडता कामा नये, असे सुमंत म्हणाले.
'तिफण कविता महोत्सव म्हणजे दुर्लक्षित गावखेड्यातल्या कवींना व्यासपीठ मिळवून देणारा आणि कवी, कवित्वाचा सन्मान करणारा महोत्सव आहे. या महोत्सवामुळे कन्नडचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर कोरले गेले आहे, असे दिघे म्हणाले. या महोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. यावेळी 'तिफण लोकवाद्य विशेषांक', अंबादास सगट लिखित 'राष्ट्राचा गौरव भिल्ल समाज', ज्ञानेश्वर गायके लिखित
'पारखं झालं गाव', समाधान निकम लिखित 'उत्क्रांतीची गोष्ट', नारायण कुटे लिखित 'बाप रगत पेरतो', लक्ष्मण वाल्डे लिखित 'ठोका काळजाचा', 'घामाने भिजलेली माती' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गितांजली गजबे यांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर गायके, छाया वाघ, संपतराव केरे यांच्या पुस्तकांना राज्यस्तरीय तिफण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या महोत्सवानिमित्त कविता चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रसिद्ध
चित्रकार गिरीश सरनाईक, बी. एस. सोननीस, मनोज चौधरी, विजय बोरसे यांनी चित्रे रेखाटली होती. अनिता राठोड, संदीप ढाकणे, प्रविण दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. या महोत्सवाला राज्यभरातील रसिक, उपस्थित होते. या निमित्त चित्रकार गिरीश सरनाईक, बी. एस. सोननीस, मनोज चौधरी, विजय बोर्से यांनी कवितांचे सुबक रेखाटने केली होती. ज्ञानेश्वर गायके, संदीप वाकडे, श्रीराम दापके, शुभदा देवरे, प्रकाश शहरवाले, सुरेश औटे आदींनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis