

अमरावती, 16 जानेवारी (हिं.स.) : अमरावती महानगरपालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून एकूण ८७ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने महानगरपालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
यंदाच्या निवडणुकीत अमरावतीत बहुपक्षीय लढतीचे चित्र पाहायला मिळाले. जाहीर झालेल्या निकालांनुसार भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २५ जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. तथापि, सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ४४ जागांचा बहुमताचा आकडा भाजपला गाठता आलेला नाही.
काँग्रेस पक्षाने १६ जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व भक्कम ठेवले असून युवा स्वाभिमान संघटनेनेही १६ जागा जिंकत महत्त्वाची राजकीय ताकद म्हणून उदयास आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना ११ जागा मिळाल्या असून एमआयएमने १० जागांवर विजय मिळवत शहरी अल्पसंख्याक मतदारांमध्ये आपला प्रभाव कायम राखला आहे.
शिवसेना शिंदे गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला २ जागा मिळाल्या आहेत. बहुजन समाज पार्टीने ३ जागांवर यश मिळवले असून वंचित बहुजन आघाडीला १ जागा मिळाली आहे.
या निकालांवरून अमरावती महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्वतंत्रपणे सत्ता स्थापन करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युती आणि आघाडीचे राजकारण निर्णायक ठरणार आहे. मतदारांनी विकास, स्थानिक प्रश्न आणि नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचे या निकालांतून दिसून येते.
दरम्यान, विजयी उमेदवार आणि समर्थकांकडून जल्लोष केला जात असून पराभूत पक्ष आत्मपरीक्षणाच्या भूमिकेत गेले आहेत. आता महापौरपद आणि स्थायी समितीवर कोणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे.
जागानिहाय निकाल (एकूण जागा – ८७):
भाजप – २५
काँग्रेस – १६
युवा स्वाभिमान – १६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ११
एमआयएम – १०
शिवसेना (शिंदे गट) – ३
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – २
बहुजन समाज पार्टी – ३
वंचित बहुजन आघाडी – १
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी