
रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)।
रायगड जिल्ह्यात मागील एक वर्षात सर्पदंशाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ४२१ सर्पदंशग्रस्त रुग्णांपैकी ४१९ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, उपचारास उशीर झाल्याने दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच जंगलालगतच्या भागात सापांचा वावर अधिक असल्याने शेतीकाम, घराभोवती वाढलेली झुडपे, रात्रीच्या वेळी अपुरी खबरदारी आणि अंधश्रद्धा यांमुळे सर्पदंशाच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सर्पदंश रुग्णांसाठी विशेष तयारी केली होती.
जिल्हा रुग्णालयात अँटी-स्नेक व्हेनमचा पुरेसा साठा, आवश्यक आपत्कालीन औषधे तसेच प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिका २४ तास कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. रुग्ण दाखल होताच तातडीने तपासण्या करून उपचार सुरू केल्याने गंभीर अवस्थेतील अनेक रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले. डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे सर्पदंश उपचार प्रभावी ठरल्याचे प्रशासनाने नमूद केले.
दरम्यान, सर्पदंशानंतर पहिल्या काही तासांत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. वेळेत रुग्णालयात पोहोचलेल्या रुग्णांची प्रकृती लवकर सुधारली, तर उशिरा दाखल झालेल्या काही रुग्णांमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याचे आढळून आले.
यासंदर्भात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांनी सांगितले की, “सर्पदंश झाल्यास घरगुती उपाय किंवा अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावे. रात्री टॉर्चचा वापर, घराभोवती स्वच्छता, झुडपे काढणे तसेच चप्पल किंवा बूट वापरणे आवश्यक आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके