वसई–विरार महापालिकेवर बविआची सत्ता अबाधित; ७१ जागांसह दणदणीत विजय
पालघर, 16 जानेवारी (हिं.स.)। वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालात बहुजन विकास आघाडीने (बविआ) जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण ११५ जागांपैकी तब्बल ७१ जागांवर बविआच्या उमेदवारांनी विजय मिळवत महापालिकेवरील सत्ता कायम राखली आ
वसई–विरार महापालिकेवर बविआची सत्ता अबाधित; ७१ जागांसह दणदणीत विजय


पालघर, 16 जानेवारी (हिं.स.)।

वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालात बहुजन विकास आघाडीने (बविआ) जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण ११५ जागांपैकी तब्बल ७१ जागांवर बविआच्या उमेदवारांनी विजय मिळवत महापालिकेवरील सत्ता कायम राखली आहे. भाजपाला ४३ जागांवर समाधान मानावे लागले असून शिवसेना (शिंदे गट) केवळ एका जागेवरच विजयी ठरली आहे. उर्वरित पक्षांना एकही जागा मिळवता आलेली नाही.

या निकालाने वसई–विरारमधील बविआची राजकीय पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपला बालेकिल्ला अभेद्य राखत पक्षाची संघटनात्मक ताकद आणि जनाधार सिद्ध केला आहे. अनेक प्रभागांमध्ये चारच्या पॅनलने विजय मिळवत बविआने विरोधकांना धक्का दिला आहे.

बविआने प्रभाग क्रमांक १, ३, ४, ६-०१, ७, ८, ९, १२, १३, १४, १९, २०, २१-०३, २४, २५, २६, २७, २८ व २९ या प्रभागांमध्ये चारच्या पॅनलसह वर्चस्व गाजवत एकूण ७१ उमेदवार विजयी केले. दुसरीकडे भाजपाने प्रभाग क्रमांक २, ५, ६-०३, १०, ११, १५, १६, १७, १८, २१-०१, २२ व २३ या प्रभागांत विजय मिळवला.

या दणदणीत यशामुळे वसई–विरार महापालिकेच्या आगामी कारभारावर बहुजन विकास आघाडीचा ठसा अधिक ठळकपणे उमटणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि प्रशासनावर बविआचे नियंत्रण अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande