चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची कचरा प्रकल्पाला भेट
रत्नागिरी, 16 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शहराच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देत पालिकेच्या कचरा प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उतरून प्रत्यक्ष पाहणी करत प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. चि
कचरा प्रकल्पाला चिपळूण नगराध्यक्षांची भेट


रत्नागिरी, 16 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शहराच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देत पालिकेच्या कचरा प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उतरून प्रत्यक्ष पाहणी करत प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली.

चिपळूण शहरात २०२१च्या महापुरात जमा झालेला मोठ्या प्रमाणातील कचरा या ठिकाणी साठविण्यात आला असून, त्यावर सध्या प्रक्रिया सुरू आहे. हा प्रलंबित कचरा तातडीने हटवून येत्या दीड महिन्यात संपूर्ण काम पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश नगराध्यक्षांनी दिले.

मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी माहिती देताना सांगितले की, प्रकल्पात नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्याद्वारे कचऱ्याचे विघटन करून खत तयार केले जात आहे. आणखी एक नवीन यंत्र आणण्यात आले असून त्यासाठी शेड उभारणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे तीन टन कचऱ्यावर प्रक्रिया करता येणार आहे.

चिपळूण शहरातून दररोज सुमारे १५ टन कचरा प्रकल्पात येतो. यापैकी सुमारे ६ टन ओला कचरा असून उर्वरित सुका कचरा आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कचरा प्रकल्पात साठवून न ठेवता तातडीने त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

नवीन मशीनमधून तयार होणाऱ्या प्लेट्स औद्योगिक कारखान्यांतील बॉयलरसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. “आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने आमचा भर आहे. कचरा प्रकल्पात कचरा साठणार नाही, याची काळजी घेतली जाईल,” असे नगराध्यक्षांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक उदय जुवळे, नगरसेवक गणेश आग्रे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते व त्यांचे सहकारी, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, निशांत जंगम आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande