
रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)।
रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘स्वच्छ गाव–सुंदर गाव’ हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मोहिमेदरम्यान गावातील सार्वजनिक रस्ते, गटारे, चौक व इतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून, रानवली ग्रामपंचायतीने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या स्वच्छता मोहिमेचे विशेष आकर्षण ठरले ते शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘प्लास्टिक बंदी’ विषयावरील पथनाट्य. वाढत्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडले. “प्लास्टिक हटाव, पृथ्वी वाचवा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या उपक्रमात सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी श्रमदानातून सक्रिय सहभाग घेतला. यावेळी सरपंचांनी सांगितले की, “प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली रानवली गाव प्लास्टिकमुक्त व स्वच्छ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत नवे चैतन्य निर्माण झाले आहे.” या अभियानामुळे रानवली परिसरात स्वच्छतेचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, तालुक्यातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके