
लातूर, 16 जानेवारी (हिं.स.)।
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. न्याय्य, नि:पक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशाने जिल्हा परिषद कार्यालयात जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी यांची, तर सहायक नोडल अधिकारी म्हणून महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कक्षात प्रदीप बोंबले, बालाजी पोतदार, विष्णू शिंदे, राहुल सुतार आणि गणेश लोणकर यांचा समावेश आहे. तसेच, प्रत्येक तालुकास्तरावर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन आढळल्यास नागरिकांनी त्वरित जिल्हा आदर्श आचारसंहिता कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि इतर संबंधित व्यक्तींनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis