कोल्हापूर महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत; काँग्रेसची झुंज अयशस्वी
कोल्हापूर, 16 जानेवारी (हिं.स.)। कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत महायुतीने मोठ्या कसोशीने भाजप 26, शिवसेना शिंदे गट 15, राष्ट्रवादी अजित पवार गट 4 अशा 45 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आणि कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ता हस्तगत केली. तर 34
कोल्हापूर मनपा


कोल्हापूर, 16 जानेवारी (हिं.स.)।

कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत महायुतीने मोठ्या कसोशीने भाजप 26, शिवसेना शिंदे गट 15, राष्ट्रवादी अजित पवार गट 4 अशा 45 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आणि कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ता हस्तगत केली. तर 34 जागेवर काँग्रेसने विजय मिळवत सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला. घटकपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला केवळ 1 जागा मिळाली त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांची एकाकी तरीही चिवट झुंज सत्तेसाठी अपुरी पडली. महाविकास आघाडीला महायुतीने 35 जागेवर रोखले. महायुतीशी फारकत घेतलेल्या जनसुराज्यलाही एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

कोल्हापूरमध्ये महायुतीविरुद्ध काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी एकाकी लढत दिली. तरीही पाटील त्यांनी एकहाती मैदान मारताना तब्बल 34 जागा निवडून आणून लक्षणीय यश मिळवले. शिवसेना ठाकरे गटाला केवळ एक जागा मिळाली. त्यामुळे कोल्हापूरची महापालिकेतील सत्ता सतेज पाटील यांच्या हातून निसटली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या. जनसुराज्यने एक जागा जिंकली. कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह वंचित बहुजन आघाडी आणि आपने मिळून केलेल्या तिसऱ्या आघाडीची पाटी कोरी राहिली.

महायुतीने प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते प्रचारात उतरूनही सतेज पाटील यांनी काँग्रेससाठी मिळवलेलं यश लक्षणीय ठरले आहे. राज्यात एकमेव कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुतीतील तिन्ही घटकपक्ष एकत्र होते.

काँग्रेसचे 81 पैकी 75 जागांवर उमेदवार होते. तर शिवसेना ठाकरे गटाने 6 जागा लढवल्या होत्या. यामध्ये काँग्रेसचे 34 उमेदवार विजयी झाले. शिवसेना ठाकरे गटाचा केवळ एक उमेदवार विजयी झाला.

दुसरीकडे महायुतीत भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला 26 जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या. मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिडोर्ले जे काँग्रेसकडून पुरस्कृत होते ते पराभूत झाले.

या निवडणुकीसाठी महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकसंघपणे प्रयत्न केले. नियोजन, प्रचार यामध्ये चांगली आघाडी घेतली. तरीही ही लढत उत्तरोत्तर सतेज पाटील विरुद्ध महायुती अशीच झाली होती. सतेज पाटील यांनी 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं' त्या पद्धतीने कॅम्पेन

करताना रस्त्यावर उतरून जनतेशी संवाद साधला. त्यानंतर प्रथम पंचनामा आणि नंतर जाहीरनामा प्रसिद्ध केला. याला प्रत्युत्तर देत

महायुतीला प्रचार यंत्रणा राबववी लागली. यातून मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, यांना कोल्हापुरात प्रचाराला यावं लागलं. अखेरच्या टप्प्यात महायुतीने प्रचाराला वेग दिला. आणि यश पदरात पाडून घेतले.

कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी एकूण 20 प्रभागात 81 जागेसाठी 3 लाख 29 हजार 205 म्हणजे 66.54 टक्के मतदारांनी केले होते.

या सर्व मतदानाची शहरातील ५ मतमोजणी केंद्रात मतमोजणी सकाळी १० वाजता सुरु झाली. प्रशासक, निवडणूक अधिकारी के. मंजूलक्ष्मी, अति. आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शानाखाली मतमोजणी करण्यात आली. दुपारी 1.30 पर्यंत बहुतेक मतमोजणी केंद्रात मतमोजणी पूर्ण झाली. काही तांत्रिक अडचणी, हरकतीमुळे रखडलेल्या प्रभागांसह संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया 3 वाजे पर्यंत पूर्ण करण्यात आली. शहरातील प्रत्येक प्रभागात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोषी मिरवणूका काढल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande