
बीड, 16 जानेवारी (हिं.स.)।
माजलगाव तालुक्यामधील खरात आडगाव परिसरातील जय महेश शुगर इंडस्ट्रीजमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य आणि शेती व्यवसाय घोक्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालय, पर्यावरण मंत्री आणि इतर कार्यालयांना लेखी तक्रार दिली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धूर आणि काजळी हवेत सोडली जात आहे. याचा थेट परिणाम शेतातील पिकांवर होत असून, काजळीमुळे पिकांची वाढ खुंटते. उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. कारखान्यातून
निघणारे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट कॅनॉल, नाले आणि शिवारातील खदानींमध्ये सोडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सांडपाण्यामुळे विहिरींचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्य आणि जनावरांवर विपरीत परिणाम होत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दूषित पाण्यामुळे जनावरे गाभण राहत नाहीत. व्याहात अडचणी येतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये क्षयरोगासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. अनेकांना डोळ्यांचे विकार आणि श्वसनाचा त्रास जाणवत आहे. या सर्व प्रकारांवर तात्काळ आळा घालावा. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने पाहणी करून योग्य पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis