
रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे होळीच्या मैदानाशेजारी टाकलेल्या कचऱ्याला लागलेल्या आगीत एका खाजगी बसला भीषण आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना दि. १६ जानेवारी रोजी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 01 GP 6100 क्रमांकाची ही बस सुरेश दळवी यांच्या मालकीची असून ती ४० ते ५० आसनी क्षमतेची होती. सदर बस गेल्या काही महिन्यांपासून बोर्ली पंचतन येथील होळीच्या मैदानाजवळ उभी होती. याच ठिकाणी अज्ञात व्यक्तीने टाकलेल्या कचऱ्याला आग लावल्याने, वाऱ्याच्या झोक्यामुळे आग पसरत बसच्या चाकांनी पेट घेतला.
आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, परिसरात पाण्याची नळव्यवस्था नसल्याने दुचाकीवरून पाणी आणूनही आग आटोक्यात आणता आली नाही.
त्यानंतर श्रीवर्धन तसेच दिघी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली; मात्र तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून “येथे कचरा टाकू नये” असा सूचना फलक असतानाही बेशिस्तपणे कचरा टाकला जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. बोर्ली पंचतन ही तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असल्याने, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी येथे कायमस्वरूपी अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके