
पुणे, 16 जानेवारी (हिं.स.)। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३७ मध्ये भाजपने जोरदार कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे. या प्रभागातून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले असून, त्यामुळे संपूर्ण प्रभागावर भाजपचा (BJP) झेंडा फडकला आहे. या विजयामुळे शहराच्या राजकारणात भाजपची ताकद आणखी भक्कम झाल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्रमांक ३७ मधून भाजपचे किशोर धनकवडे, वर्षा तापकीर, अरुण राजवाडे आणि तेजश्री बदक यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, या प्रभागातील भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती, जी शेवटपर्यंत कायम राहिली. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेली लढत आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत आणि भाजपचे उमेदवार अरुण राजवाडे यांच्यात पाहायला मिळाली. या चुरशीच्या लढतीत अरुण राजवाडे यांनी गिरीराज सावंत यांचा पराभव करत विजय संपादन केला आहे. त्यामुळे हा निकाल राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु