
पुणे, 16 जानेवारी (हिं.स.)।
महापालिकेने मिळकत कर थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेची अंतिम तारीख संपत असली तरी अपेक्षित उत्पन्नापर्यंत पोहोचण्यात महापालिकेला अपयश आले आहे. मागील दोन महिन्यांत नागरिकांकडून सुमारे 750 कोटी रुपयांचा भरणा झाला असला, तरी चालू आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकात गृहीत धरलेले 3 हजार 250 कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठणे कठीण असल्याचे स्पष्ट होत आहे.महापालिकेने चालू वर्षात मिळकत करातून 3 हजार 250 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. मात्र, आतापर्यंत जेमतेम सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचेच उत्पन्न मिळाले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अद्याप अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असला, तरी या काळात अपेक्षित तफावत भरून निघेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासनाने 15 नोव्हेंबर 2025 ते 15 जानेवारी या कालावधीत मिळकत कर थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली होती. या योजनेअंतर्गत थकीत मिळकत करावरील दंडाच्या रकमेत 75 टक्के सवलत देण्यात आली. मोबाईल टॉवरची थकबाकी वगळता, इतर मिळकत धारकांकडे एकूण 12 हजार 161 कोटी रुपयांची थकबाकी होती. यामध्ये मूळ कर रक्कम 3 हजार 158 कोटी रुपये, तर दंडाची रक्कम 9 हजार 2 कोटी रुपये इतकी होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु