
पुणे, 16 जानेवारी (हिं.स.)।
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तास्थान मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास स्पष्टपणे वाढलेला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
आज पुण्यात भाजपची एक महत्त्वाची रणनीती बैठक पार पडली. या बैठकीस केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आखण्यात येणारी रणनिती, संभाव्य उमेदवारांची निवड, संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत पुणे जिल्हा परिषद निवडणूक भाजपने कोणत्याही आघाडीशिवाय स्वबळावर लढावी, असा स्पष्ट सूर अनेक नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला. पुणे उत्तर व पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील सत्तेचा अनुभव आणि संघटनात्मक ताकद लक्षात घेता जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपला यश मिळू शकते, असा विश्वास बैठकीत व्यक्त झाला. येत्या काही दिवसांत पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर होण्याची शक्यता असून, राजकीय वातावरण तापण्याचे संकेत मिळत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु