
अमरावती, 16 जानेवारी (हिं.स.) : अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत साईनगर प्रभागातून युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार सचिन भेंडे यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांचा तब्बल ४ हजार मतांनी पराभव करत सचिन भेंडे विजयी झाले.
ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. आमदार रवी राणा यांनी या प्रभागात संपूर्ण ताकद, संघटनात्मक यंत्रणा आणि राजकीय वजन पणाला लावले होते. निवडणूक प्रचाराच्या काळात साईनगर प्रभागात जोरदार वातावरण निर्माण झाले होते. प्रचार रॅल्या, बैठका, पदाधिकाऱ्यांची फळी आणि थेट जनसंपर्क मोहिमेद्वारे दोन्ही बाजूंनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, स्थानिक प्रश्न, विकासकामांची गती आणि प्रभावी जनसंपर्क याचा फायदा युवा स्वाभिमान संघटनेच्या उमेदवाराला झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले. मतदारांनी परिवर्तनाला पसंती दिल्याचे या निकालातून दिसून आले.
विजयानंतर माध्यमांशी बोलताना सचिन भेंडे यांनी भावना व्यक्त करत सांगितले,
“सत्याचा नेहमी विजय होत असतो. हा विजय माझा वैयक्तिक नसून साईनगर प्रभागातील सर्व मतदारांचा आहे. जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.”
यावेळी त्यांनी सर्व समर्थक, कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले.
भाजपचे उमेदवार तुषार भारतीय हे भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचे लहान बंधू असूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे हा निकाल भाजपसाठी धक्कादायक मानला जात आहे.
दुसरीकडे, आमदार रवी राणा यांच्यासाठी हा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला असून त्यांच्या नेतृत्वाखालील उमेदवाराने साईनगर प्रभागात वर्चस्व सिद्ध केल्याचे चित्र आहे.
सचिन भेंडे यांनी पुढे बोलताना सांगितले की, “प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे हे माझे प्राधान्य असेल. निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक शब्दाची पूर्तता करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.”
या निकालामुळे अमरावती महानगरपालिकेच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होत असल्याची चर्चा सुरू झाली असून, युवा स्वाभिमान संघटनेच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात महापालिकेतील राजकारण अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी