
रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात सिकलसेल अॅनिमियाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियानाचा शुभारंभ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात आला. या अभियानाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रवीण कांदडे, अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. आशिष मिश्रा, अधिसेविका गायत्री म्हात्रे, सहायक अधिसेविका अनिता भोपी आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत ० ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.
रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ५५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, त्याअंतर्गत २८० उपकेंद्रे, ६ उपजिल्हा रुग्णालये, ८ ग्रामीण रुग्णालये तसेच १५ तालुका आरोग्य कार्यालयांमध्ये तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या अभियानासाठी जिल्ह्यात २९७ आरोग्य पथके सिकलसेल सर्वेक्षणाचे काम करणार आहेत.
दरम्यान, सिकलसेलमुक्त रायगड जिल्हा घडविण्यासाठी सर्व नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, विशेषतः तरुणांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे. तपासणी शिबिराच्या पहिल्या दिवशी अलिबाग जिल्हा रुग्णालयात २१ जणांची तपासणी करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके