
रत्नागिरी, 16 जानेवारी, (हिं. स.) : दहावीपर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेली गौरी गणेश सुर्वे हिने 'आयआयटी कानपूर' या देशातील नामवंत संस्थेतून उत्तम गुणांनी केमिकल इंजिनीअर पदवी संपादनक केली आहे. भारतासह स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया या देशांतील नामवंत कंपन्यांनी ती प्रोसेस इंजिनीअर म्हणून आपल्याकडे यावी, म्हणून लाखो रुपयांचे पॅकेज देऊ केले आहे.
गौरी सुर्वे खेडशी (ता. रत्नागिरी) येथील रहिवासी असून तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण कुवारबावच्या श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलमध्ये झाले. गौरीने २०१८ साली दहावीत ९२.२० टक्के गुण मिळवले. पुढे रत्नागिरीतीलच अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात तिने शास्त्र शाखेत प्रवेश घेतला आणि बारावीत ९०.९१ टक्के गुण मिळवले. केमिस्ट्री हा तिच्या विशेष आवडीचा विषय आहे. तिने जेईई परीक्षा दिली आणि त्यात तिचा देशभरात ७५००वा क्रमांक आला. 'आयआयटी-मुंबई'मध्ये प्रवेश मिळवण्याची तिची इच्छा पूर्ण झाली नाही; मात्र 'आयआयटी-कानपूर'मध्ये तिला प्रवेश मिळाला. पाच वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर तिला आता बीटेक + एमटेक (केमिकल इंजिनीअरिंग) अशी द्विपदवी मिळणार असून, जानेवारी २०२६च्या अखेरीला अंतिम निकाल जाहीर होणार आहे. आतापर्यंतच्या सेमिस्टरमध्ये तिचा सीजीपीए ८.८ एवढा आहे. म्हणजेच हे गुण साधारण ८८ टक्के एवढे होतात.
तिच्या यशानंतर अहमदाबादमधील बीएएसएफ, स्वित्झर्लंडमधील क्लॅरिएंट इंटरनॅशनल तसेच दक्षिण कोरियातील एका नामवंत कंपनीनेही ग्रॅज्युएट प्रोसेस इंजिनीअर म्हणून गौरीला लाखो रुपयांच्या नोकरीचे ऑफर लेटर दिले आहे. मात्र गौरीला केवळ नोकरी करायची नाही, तिला अधिक संशोधन करायचे आहे. त्यामुळे आपल्याला एमएस करण्याची संधी आणि चांगली स्कॉलरशिप जेथे मिळेल ती ऑफर आपण स्वीकारणार आहोत, असे तिने सांगितले.
सध्याच्या जीवनात रसायनांचा वापर वाढला आहे. औषधांपासून कोणत्याही खतांपर्यंत जवळपास सर्वच प्रकारच्या उत्पादनांच्या निर्मितीत विविध प्रकारच्या रसायनांचा वापर होतो आणि त्या प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात किंवा कचऱ्यातही रसायने असतात. पर्यावरणात घातक रसायने कमीत कमी प्रमाणात जावीत किंवा जाऊच नयेत, हे पाहण्यामध्ये प्रोसेस इंजिनीअरची मुख्य भूमिका असते. केमिकल इंजिनीअरिंग ही अशी शाखा आहे, की तिथे रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) अशा दोन्ही शाखांचे शिक्षण त्यात मिळते. आजच्या प्रदूषणाच्या काळात प्रोसेस इंजिनीअर्सचे महत्त्व खूपच वाढले असून, पुढच्या पिढ्यांपर्यंत पर्यावरण टिकवण्याच्या दृष्टीने तरुण प्रोसेस इंजिनीअर्सनी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे. आयआयटी-कानपूरमधील प्रा. संजीव गर्ग हे गौरीचे गाइड होते आणि त्यांनी आपल्याला या जबाबदारीची जाणीव दिल्याचे गौरीने आवर्जून नमूद केले. त्यांच्यासह तिने आतापर्यंत काही रिसर्च पेपर्सही लिहिले आहेत. आयर्न मेटॅलोप्रोटीन हा औषधांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक असतो. त्यामध्ये गौरीने संशोधन केले आहे. तिच्याकडे उत्तम विश्लेषण कौशल्य असून, तिने तिच्या विषयातील पायाभूत ज्ञानही उत्तम रीतीने मिळवले आहे, असे निरीक्षण तिला ऑफर लेटर देणाऱ्या एक कंपनीने नोंदवले आहे.
केमिकल रिअॅक्शन इंजिनीअरिंग, कॅटालिसिस, हीट अँड मास ट्रान्स्फर, प्रोसेस कॅल्क्युलेशन्स या विषयांमधील कौशल्य गौरीने प्राप्त केले आहे. स्वित्झर्लंडच्या कंपनीत जायचे झाले तर जर्मन भाषा बी-टू पातळीपर्यंत शिकणे आवश्यक असते. त्यामुळे अद्याप कोणत्या कंपनीची ऑफर स्वीकारायची हे नक्की झाले नसले, तरी तिने जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली आहे. मोठे यश मिळाले असले, तरी त्यात रमून न राहता तिने आपल्या पुढच्या संशोधनाच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी