
रायगड, 16 जानेवारी (हिं.स.)।
शिवाजी चौक व अंबिका भुवन नाका येथे राजकीय बॅनर झळकले आहेत.निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचा नेरळ शहरात उघडपणे भंग होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शहरातील प्रमुख शिवाजी चौक तसेच अंबिका भुवन नाका या वर्दळीच्या ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे व उमेदवारांचे बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज झळकत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार सार्वजनिक ठिकाणी, चौक, रस्त्यांच्या कडेला, विद्युत खांबांवर किंवा शासकीय मालमत्तेवर कोणतेही प्रचार साहित्य लावण्यास स्पष्ट बंदी आहे. असे असतानाही संबंधित ठिकाणी नियमांना डावलून बॅनर लावण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. या बॅनरवर उमेदवारांचे फोटो, पक्षचिन्हे तसेच थेट प्रचार संदेश स्पष्टपणे दिसून येत असून हे आचारसंहितेचे सरळ उल्लंघन मानले जात आहे.
या प्रकारामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, आचारसंहिता लागू असतानाही प्रशासन व स्थानिक यंत्रणांकडून ठोस आणि प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी मागणी यानिमित्ताने पुढे येत आहे.
या प्रकरणी निवडणूक विभागाने तातडीने दखल घेऊन संबंधित राजकीय पक्ष व उमेदवारांवर कारवाई करावी, तसेच बेकायदेशीर बॅनर त्वरित हटवावेत, अशी मागणी नेरळमधील सुजाण नागरिकांकडून करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात काटेकोरपणे अंमलात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके