
छत्रपती संभाजीनगर, 16 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत स्पष्ट बहुमतानचा आकडा गाठला आहे. दुपारपर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार, ११५ पैकी ५८ जागांवर विजय मिळवत भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर आहे. या निवडणुकीत 'एमआयएम'ने अपेक्षेप्रमाणे यश मिळवत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे, तर शिवसेनेता तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना या निवडणुकीत मोठा फटका बसला. शिवेसना (यूबीटी) ने केवळ चार उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, बंचित बहुजन आपाडीने महापालिकेत प्रवेश मिळवत आपली उपस्थिती नोंदवली आहे. तर माजी महापौर अनिता घोडेले, त्र्यंबक तुपे आणि रशिद मामू या तीन माजी महापौरांनी पुन्हा एकदा सभागृहात प्रवेश केला आहे. मात्र, भाजपने माजी महापौर भगवान महामोडे यांच्या पत्नी घडामोडे यांचा पराभव झाला.
मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. संपूर्ण विभागात सत्तेचे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि जालना या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर लातूर आणि परभणीमध्ये अनुक्रमे काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांनी आपले बालेकिल्ले राखले आहेत. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत मतदारांनी कुठे विकासाच्या मुद्द्याला, तर कुठे भावनिक आवाहनाला साथ दिल्याचे दिसून येते.
जालना येथील महानगरपालिकेच्या पहिल्यांदा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत एकतर्फी विजय मिळवला. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद झाली.
दुसरीकडे, वरिष्ठ नेत्यांच्या प्रचाराअभावी शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. महाविकास आघाडीतील फुटीचाही भाजपला फायदा झाला. राष्ट्रवादीने ४० उमेदवार उतरवून ही त्यांना प्रभाव पाडता आला नाही, तर एमआयएमने दोन जागांसह खाते उघडले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबदल केलेले वादग्रस्त विधान आणि अंतर्गत गटबाजी भाजपाला महाग पडली. लातूर महापालिकेत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. ७० पैकी ४३ जागा जिंकत काँग्रेसने आपला गड राखला, तर मित्रपक्ष वंचित बहुजन आघाडीने ५ पैकी ४ जागा जिंकत 'स्ट्राइक रेट' कायम ठेवला. भाजपला २२ जागा मिळाल्या. आमदार अमित देशमुख यांनी कोणत्याही मोठ्या नेत्याच्या मदतीशिवाय ही निवडणूक एकहाती जिंकली. शिवसेनेचे दोन्ही पक्ष आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांना या निवडणुकीत खातेही उपजता आले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रचारादरम्यान केलेल्या 'विलासरावांच्या आठवणी पुसून टाका या वक्तव्याचाही कांग्रेस कार्यकत्यांनी खरपूस समाचार घेतला.
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक मुसंडी मारत ८१ पैकी ४२ हुन अधिक जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे नांदेड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपनी सता आली आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या नियोजनाखाली सक्षम उमेदवारांची निवड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झंझावाती सभा भाजपसाठी निर्णायक ठरल्या. दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि 'एम आय एम'सह सर्वच विरोधी पक्षांना प्रभावी प्रचारयंत्रणा राबवण्यात अपयश आले.
परभणी महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि कॉंग्रेस आघाडीने ३६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यात शिवसेना २४ जागांसह सर्वात मोठा पक्ष असून, कॉग्रेसने १२ जागांवर विजय मिळवला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis