मुंबईतील वार्ड ४७ मधून  तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा दणदणीत विजय
मुंबई, 16 जानेवारी (हिं.स.) : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांनी प्रचंड मतांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांना उमेदवारी
तेजिंदर सतनाम सिंग तिवाना


मुंबई, 16 जानेवारी (हिं.स.) : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांनी प्रचंड मतांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यामुळे ही जागा भाजपासाठी मान, सन्मान आणि प्रतिष्ठेचा विषय ठरली होती.

भाषिक, सांस्कृतिक व सामाजिक वैविध्याने नटलेल्या वार्ड ४७ मध्ये विजय मिळवणे भाजपासाठी मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत या वार्डमधून भाजपाला विजय मिळवून देण्याची क्षमता केवळ तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांच्यातच होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या वार्डातील मतदारसंरचनेत सुमारे २२ टक्के मराठी, २१ टक्के दक्षिण भारतीय, १२ टक्के ख्रिश्चन आणि ६ टक्के मुस्लिम मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेससारख्या पक्षांसाठी हा प्रभाग सहज विजयाचा मानला जात होता. दुसरीकडे भाजपाचे पारंपरिक मतदार—१७ टक्के उत्तर भारतीय/पंजाबी आणि १८ टक्के गुजराती/राजस्थानी—लक्षणीय संख्येत असले तरी पुनर्विकास प्रकल्पांमुळे अनेक मतदार वार्डाबाहेर स्थलांतरित झाले होते. त्यातच मतदानाचा दिवस मकर संक्रांतीचा असल्याने गुजराती मतदारांची अनुपस्थिती हे मोठे आव्हान होते.

या सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करत मिळवलेला हा विजय तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांच्या अथक मेहनतीचा, स्थानिक पातळीवरील प्रचंड स्वीकारार्हतेचा आणि घरोघरी पोहोचलेल्या प्रभावी जनसंपर्काचा परिणाम आहे.

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना आणि त्यांचे कुटुंब गेली ४० हून अधिक वर्षे या परिसरात सातत्याने जनसेवा करत आहे. कोणताही पदभार नसतानाही नागरिकांच्या अडचणींसाठी २४x७ उपलब्ध राहण्याची त्यांची परंपरा असल्यामुळेच परिसरातील जनतेचा त्यांच्या कुटुंबावर दृढ विश्वास आहे.

या विजयाचे श्रेय भाजपाच्या ज्येष्ठ नेतृत्वालाही जाते, ज्यांनी युवकांवर विश्वास टाकत त्यांना संधी दिली. युवकांनी आपल्या नव्या विचारसरणी, ऊर्जेने आणि संघटन कौशल्याने या बीएमसी निवडणुकीचे राजकीय चित्रच बदलून टाकले आहे.

तेजिंदर यांचे “मदत का ठिकाना” हे अभिनव अभियान या निवडणुकीची ओळख ठरले. या अभियानामुळे निर्माण झालेला उत्साह नगरसेवक निवडणुकीपुरता मर्यादित न राहता विधानसभा निवडणुकीसारखा भासू लागला. अभियानातील गीते, जाहिरात चित्रफिती आणि सोशल मीडियावरील प्रभावी संवाद थेट जनतेच्या हृदयाला भिडला.

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा हा विजय खऱ्या अर्थाने मुंबईच्या स्पिरिटचा विजय आहे—जिथे भाषा, प्रांत आणि समाजाच्या पलीकडे जाऊन, मेहनती, नेहमी उपलब्ध असलेल्या एका तरुण नेतृत्वाला जनतेने प्रचंड विश्वासाने विजयी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande