
छत्रपती संभाजीनगर, 17 जानेवारी (हिं.स.)। खुलताबादनगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी क्रॉस वोटिंग करीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला हात उंच करून मतदान केल्याने भारतीय जनता पक्षाचे नवनाथ बारगळ हे अकरा विरुद्ध नऊ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गजानन फुलारे यांना नऊ मते मिळाली, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सय्यद आमेर पटेल हे थेट नगराध्यक्षपदी तर चार काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नऊ नगरसेवक निवडून आले तर भाजपचे सात नगरसेवक निवडून आले होते. पक्षीयबलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन फुलारे हे उपनगराध्यक्ष होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.
पदाच्या बोलवण्यात उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत भाजपचे पुरेसे संख्याबळ नसताना देखील काँग्रेस नगरसेवकांच्या पाठींब्यावर उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नवनाथ बारगळ ११ मते घेऊन विजयी झाले. यामुळे काँग्रेसची नाचक्की झाली. नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी सय्यद आमेर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सुरुवातीला उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून नवनाथ बारगळ यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन फुलारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. हात उंच करून मतदान घेण्यात आले. भाजपचे नवनाथ बारगळ यांना ११ मते मिळाली तर राष्ट्रवादीचे गजानन फुलारे यांना आठ मते मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis