
अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.)
अमरावती पालिका निवडणुकीत ४ माजी महापौर आणि ४ माजी उपमहापौर रिंगणात होते. यापैकी तीन माजी महापौरांनी विजय मिळवला, तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला. याउलट, माजी उपमहापौरांमध्ये केवळ एकालाच यश मिळाले, तर तिघे पराभूत झाले.
विजयी झालेल्या माजी महापौरांमध्ये काँग्रेसचे विलास इंगोले आणि भाजपचे चेतन गावंडे व संजय नरवणे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या चरणजीत कौर उर्फ रिना नंदा यांना मात्र पराभव पत्करावा लागला.
निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ४ माजी उपमहापौरांमध्ये भाजपचे चेतन पवार, कुसुम साहू आणि संध्याताई टिकले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार यांचा समावेश होता. यापैकी केवळ शेख जफर शेख जब्बार यांनाच विजय मिळवता आला, तर इतर तिघांना पराभवाचा सामना करावा लागला.साईनगर, प्रभाग क्रमांक १९ मधून भाजपचे माजी महापौर चेतन गावंडे यांनी निवडणूक लढवली. या प्रभागात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने पूर्ण ताकद लावली होती आणि तुषार भारतीय यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव केला होता. मात्र, चेतन गावंडे आपला पारंपरिक गड राखण्यात यशस्वी ठरले. भाजपचे संजय नरवणे विलासनगर प्रभागातून विजयी झाले, तर विलास इंगोले यांनी अंबागेटच्या आतील जुन्या अमरावती शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळवत विजय संपादन केला.
माजी उपमहापौरांच्या बाबतीत या निवडणुकीचा निकाल काहीसा नकारात्मक राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार हे प्रभाग क्रमांक १५, छायानगर-पठाणपुरा येथून विजयी झाले. पराभूत झालेल्यांमध्ये प्रभाग क्रमांक १८ राजापेठचे चेतन पवार, प्रभाग क्रमांक ६ विलासनगर-मोरबागच्या कुसुम साहू आणि प्रभाग क्रमांक १० बेनोडा-भीमटेकडी येथील संध्याताई टिकले यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, पराभूत झालेल्या माजी उपमहापौरांपैकी काहींना गेल्या सभागृहात सोबत काम केलेल्या उमेदवारांविरुद्धच निवडणूक लढावी लागली. भाजपचे चेतन पवार यांना शिवसेनेतून (उबाठा) युवा स्वाभिमान पक्षात गेलेले माजी नगरसेवक प्रशांत वानखडे यांनी पराभूत केले. तसेच, कुसुम साहू यांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका रेखा तायवाडे यांनी हरवले, तर संध्याताई टिकले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवख्या उमेदवार अर्चना पाटील यांनी पराभूत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी