
अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.)।अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा महिलांनी राजकारणात आपली ताकद ठळकपणे सिद्ध केली आहे. २२ प्रभागांतील ८७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल ४७ महिला उमेदवार विजयी ठरल्या असून, सभागृहात महिलांचे प्रतिनिधित्व ५४ टक्क्यांवर पोहोचले आहे. यामुळे अमरावती महापालिकेच्या इतिहासात महिलांची ही सर्वाधिक उपस्थिती ठरली आहे. उर्वरित ४० जागांवर पुरुष नगरसेवक निवडून आले आहेत.
महापालिका निवडणुकीत एकूण ६६१ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये ३१७ महिला तर ३४४ पुरुष उमेदवारांचा समावेश होता. विशेष म्हणजे ८७ पैकी ४४ जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. मात्र आरक्षित जागांपुरतेच महिलांचे यश मर्यादित न राहता खुल्या जागांवरही महिलांनी विजय मिळवत आपली पकड मजबूत केली आहे. १५ जानेवारी रोजी झालेल्या मतदानात महिलांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाले.यंदाच्या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी युवा आणि नवोदित उमेदवारांवर विश्वास टाकला होता. हा निर्णय मतदारांनीही मान्य केल्याचे निकालातून स्पष्ट झाले. एकूण ८७ पैकी ५१ जागांवर पहिल्यांदाच निवडून आलेले नगरसेवक सभागृहात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रशांत धर्माळे, भाजपचे ऋषिकेश किशोर जाधव व अजय जयस्वाल देशमुख, युवा स्वाभिमान संघटनेचे सचिन भेंडे यांच्यासह विविध पक्षांतील अनेक युवा उमेदवारांना पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात प्रवेश मिळाला आहे. या नव्या चेहऱ्यांनी अनेक दिग्गज नेत्यांना पराभूत करत मतदारांचा बदलता कल अधोरेखित केला आहे.अल्पसंख्याक प्रतिनिधित्वाच्यादृष्टीनेही यंदाची निवडणूक महत्त्वाची ठरली आहे. एकूण १७ मुस्लीम नगरसेवक निवडून आले असून, यामध्ये एमआयएमचे ११, काँग्रेसचे ३, बसप व वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येकी १ नगरसेवक सभागृहात पोहोचले आहेत. मागील महापालिकेत १८ मुस्लीम नगरसेवक होते, त्याच्या तुलनेत यंदा थोडी घट झाली असली तरी प्रतिनिधित्व कायम राहिले आहे.महिलांचा वाढता सहभाग, नव्या चेहऱ्यांची दमदार एन्ट्री आणि विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व यामुळे अमरावती महापालिकेचे नवे सभागृह अधिक सक्षम आणि परिवर्तनशील ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी