
अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.)। अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी घेतलेली मते चर्चेचा विषय ठरली आहेत. एकूण २२ प्रभागांतील ८७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामागे अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते निर्णायक ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिकेच्या या निवडणुकीत एकूण ६६१ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये तब्बल ११६ अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. या अपक्ष उमेदवारांच्या पारड्यात मतदारांनी एकूण ६६ हजार ५६८ मते टाकली आहेत. ही मते जरी दोन अंकी ते चार अंकी आकड्यात विभागलेली दिसत असली, तरी अनेक प्रभागांमध्ये याच मतांमुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना अल्प फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे.
या निवडणुकीत राजकीय पक्षांइतकेच अपक्ष उमेदवारही ताकदीने मैदानात उतरले होते. अनेक प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांनी स्थानिक प्रश्न, वैयक्तिक संपर्क आणि स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर मतदारांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे काही ठिकाणी ते थेट विजयी झाले, तर अनेक ठिकाणी त्यांनी प्रमुख उमेदवारांचे गणित बिघडवले. या निवडणुकीत अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. प्रचारादरम्यान मिळणाऱ्या प्रतिसादावरून अनेक राजकीय नेत्यांना विजयाचा अंदाज येत होता. मात्र, प्रत्यक्ष निकालाने अनेकांना धक्का दिला.१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली, तर दुसऱ्याच दिवशी शुक्रवार १६ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीतून समोर आलेल्या निकालात अनेक दिग्गज उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर बोटावर मोजण्याइतक्या मतांनी निकाल फिरला. यामागे अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते हे मुख्य कारण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या या निवडणुकीत ८७ जागांसाठी ६६१ उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरस मोठ्या प्रमाणात वाढली होती. प्रमुख पक्षांसह ११६ हून अधिक अपक्ष उमेदवार मैदानात असल्याने मतविभाजन झाले आणि त्याचा थेट परिणाम निकालांवर झाला. अपक्ष उमेदवारांनी मिळवलेली ६६ हजार ५६८ मते ही केवळ आकड्यापुरती मर्यादित न राहता, अनेक प्रभागांतील सत्ता-समीकरण बदलणारी ठरल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी