
लातूर, 18 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आ. अमित देशमुख यांनी बाभळगाव येथील निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या मतदार, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींच्या भेटी घेत संवाद साधला. महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना दिलेल्या पसंतीबद्दल आणि प्रचारकाळात केलेल्या मेहनतीबद्दल त्यांनी लातूरच्या मतदारांचे तसेच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी खा. डॉ. शिवाजी काळगे, माजी आ. वैजनाथ शिंदे, माजी महापौर दीपक सूळ, विलास को-ऑपरेटिव बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्रीशैल उटगे, औसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण बाबळसुरे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी महानगरपालिका निवडणुकीतील अनुभव, स्थानिक प्रश्न, आगामी काळातील अपेक्षा मांडल्या. विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis