
रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरीतील आर्किटेक्ट कविता सावंत आणि दिव्या सुब्रमण्यम यांनी पाळीच्या काळातील जाणिवा घडविणारा ‘प्ले पिरियड’ हा वेगळा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम साकारला आहे.
मासिक पाळी हा विषय बहुतेक वेळा केवळ आरोग्यापुरताच मर्यादित ठेवला जातो. मात्र पाळी ही फक्त शरीरातील प्रक्रिया नसून, तिच्याशी संबंधित सामाजिक वर्तन, स्वच्छतेच्या सवयी, पर्यावरणावर होणारा परिणाम आणि दृष्टिकोनातील बदल यांचाही तो एक महत्त्वाचा भाग आहे. हीच व्यापक भूमिका लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
कविता सावंत आणि दिव्या सुब्रमण्यम या दोघी आर्किटेक्चरच्या पदवीधर आहेत. स्वतःचे व्यावसायिक काम सुरू असतानाही समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा त्यांना सातत्याने संशोधन आणि जनजागृतीच्या कामाकडे घेऊन आली. Royal Academy of Engineering (UK) संस्थेच्या Frontiers Champion या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी शाळांमधील मुलामुलींशी संवाद साधत पाळीच्या काळातील वर्तन, स्वच्छतेच्या सवयी, लाज-गुप्ततेची मानसिकता आणि पर्यावरणपूरक पर्याय याविषयी चर्चा सुरू केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये घेतलेल्या या सत्रांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाळीबद्दल मोकळेपणाने बोलण्याची संधी, प्रश्न विचारण्याचे सुरक्षित वातावरण आणि खेळीमेळीचा संवाद यामुळे हा उपक्रम केवळ माहितीपुरता मर्यादित राहिला नाही, तर विचारांमध्ये बदल घडवणारा ठरला. या अनुभवातूनच ‘प्ले पिरियड’ या बोर्ड गेमची संकल्पना आकाराला आली.
‘प्ले पिरियड’ हा गेम मासिक पाळी म्हणजे काय, यापेक्षा पाळीच्या काळात जबाबदार सामाजिक वर्तन कसे असावे, स्वच्छतेच्या सवयी कशा अंगीकाराव्यात, डिस्पोजेबल पॅड्समुळे होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांची जाणीव कशी ठेवावी आणि कापडी पॅड्स किंवा मेंस्ट्रुअल कपसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार कसा करावा, यावर भर देतो. खेळाच्या माध्यमातून लाज, भीती आणि गैरसमज दूर करून सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाला पूरक म्हणून ‘प्ले पिरियड’ हे एक मोफत डिजिटल अॅपही विकसित करण्यात आले आहे. या अॅपमध्ये पाळीच्या काळातील सामाजिक व पर्यावरणीय वर्तनावर आधारित माहिती, शाळा व संस्थांसाठी वापरता येईल अशी प्रशिक्षण सामग्री आणि पाळी व्यवस्थापनासाठी शाश्वत पर्यायांविषयी मार्गदर्शन उपलब्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी