
रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : नाणीज येथील माध्यमिक विद्यालयात साहित्यिक भेट कार्यक्रम पार पडला. यावेळी बालसाहित्यिक मदन हजेरी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.भाषा संवर्धन पंधरवडा सध्या सर्वत्र साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने नाणीज विद्यालयात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितावाचन, कथाकथन, पुस्तक परिचय, अभिवाचन आदी कार्यक्रम सादर केले. स्वराज चव्हाण, भूमिका दरडी, सोहम कोकरे यांनी कथाकथन केले. सानवी बेंडल या विद्यार्थिनीने श्यामची आई पुस्तकाचा परिचय सादर केला. सोनाली चव्हाण, तन्वी चव्हाण यांनी स्वरचित कविता सादर केल्या.वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेतील एका विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. शिक्षणप्रेमी अनिल हातफळे यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील हा पुरस्कार नववीतील विद्यार्थिनी युक्ता शिंदे हिला देण्यात आला. प्रमुख पाहुणे मदन हजेरी यांच्या हस्ते युक्ता हिला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
दुसर्या सत्रात मदन हजेरी यांची मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ शिक्षिका रमा मुळ्ये यांनी ही मुलाखत घेतली. मदन हजेरी यांनी प्रारंभीची शिक्षक म्हणून कारकीर्द आणि त्यानंतरची लेखक कारकीर्द उलगडली. या दोन्ही क्षेत्रातील अनुभव त्यांनी कथन केले. बालसाहित्यातील हजेरी यांचे योगदान रमा मुळ्ये यांनी उलगडून दाखवले. श्री. हजेरी यांच्या साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लिहिते होण्याचे आवाहन मदन हजेरी यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन भाषा विषय समिती आणि कवी केशवसुत ग्रंथालयाच्या वतीने करण्याता आले होते. शिक्षिका नियती गावडे यांनी सूत्रसंचालन केले तर शिक्षिका आरुषी नागले यांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी