
परभणी, 18 जानेवारी (हिं.स.)।
परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्कलनिहाय आढावा बैठका घेतल्या जात असून, त्याच अनुषंगाने आज दिनांक १८ जानेवारी रोजी पेडगाव जिल्हा परिषद सर्कलसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक आमदार राजेश विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी संतोष देशमुख, रोहन सामाले, गंगाधर जवंजाळ, मनोज राऊत यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच पेडगाव सर्कलमधील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी सांगितले की, येत्या ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक सर्कलमध्ये आढावा बैठका घेतल्या जात आहेत. जिल्ह्यातील एकमेव आमदार व जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केल्याची माहिती देत, पेडगाव सर्कलमधून संतोष देशमुख इच्छुक उमेदवार असून त्यांच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा होईल, असे संकेत त्यांनी दिले. बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis